राहूल हरिभाऊ इंगळे – पाटील
सुरांच्या छायेत तेज उमलले, अष्टपैलू संगीत विश्व उजळले; चिरतरुण ते चैतन्य मावळले, संगीताचे थोर सुवर्णयुग संपले.
भारतीय संगीत क्षेत्रातील अष्टपैलूत्वाचा महामेरू आणि सुरांच्या जादुगार स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या निधनाने एका देदीप्यमान सुवर्णयुगाचा अंत झाला आहे. लतादीदींच्या सुरांच्या सावलीत स्वतःचे तेजस्वी अस्तित्व निर्माण करणाऱ्या आशाताईंनी ८ दशकांच्या प्रवासात २० हून अधिक भाषांमध्ये १२ हजारहून अधिक गाणी अजरामर केली. ‘पिया तू अब तो आजा’ मधील ठसका असो वा ‘उमराव जान’ मधील गझलेचा नजाकत; प्रत्येक सुराला त्यांनी मानवी भावनांच्या छटा दिल्या. शून्यातून स्वरांचे विश्व निर्माण करणारी ही ‘चिरतरुण’ आशा आज मावळली असली, तरी त्यांचा झंझावाती आवाज आणि प्रयोगशील वृत्ती संगीत विश्वात सदैव चैतन्य देत राहील. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने केवळ मंगेशकर कुटुंबच नाही, तर संपूर्ण जागतिक संगीत विश्वात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. आशाताईंचा प्रवास सोपा नव्हता. ज्या काळात थोरल्या भगिनी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या सुरांचा ‘वटवृक्ष’ भारतीय सिनेसृष्टीवर पूर्णपणे विस्तारलेला होता, त्याच काळात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणे हे एक शिवधनुष्य पेलण्यासारखे होते. लतादीदींच्या सुरांच्या सावलीत न हरवता, त्यांनी स्वतःचं ‘तेज’ निर्माण केलं. लहान वयात आलेली कौटुंबिक जबाबदारी, वैयक्तिक आयुष्यातील वादळे (कमी वयातलं लग्न, मुलांची जबाबदारी) आणि संघर्षातून तावून सुलाखून निघालेला त्यांचा सुवर्णस्वर म्हणजे ‘आशा भोसले’ नावाचं एक स्वतंत्र साम्राज्य ठरलं. आशाताई म्हणजे केवळ एक गायिका नव्हत्या, तर त्या सुरांच्या जादुगार होत्या. त्यांच्या आवाजातील ‘रेंज’ थक्क करणारी होती. एका बाजूला ‘पिया तू अब तो आजा’ मधील मादकता आणि पाश्चात्य शैलीचा ठसका, तर दुसऱ्या बाजूला ‘उमराव जान’ मधील गझलेचा नजाकत आणि आर्तता. खय्याम यांच्या संगीतात ‘दिल चीज क्या है’ गाताना त्यांनी सिद्ध केलं की, त्या केवळ पॉपपुरत्या मर्यादित नाहीत, तर अभिजात संगीतावरही त्यांची तितकीच हुकूमत आहे. शास्त्रीय ते पॉप आणि लावणी ते गझल; सुरांच्या प्रत्येक प्रांतात त्यांनी अढळ पद मिळवले. एस. डी. बर्मन यांच्यापासून ए. आर. रहमानपर्यंत आणि ब्रेट लीपासून लेस्ली लुईसपर्यंत आशाताईंनी प्रत्येक पिढीच्या संगीताशी जुळवून घेतले. त्यांच्या कारकिर्दीला कलाटणी देणाऱ्या ओ. पी. नय्यर आणि आर. डी. बर्मन या जोड्यांनी त्यांच्यातील प्रयोगशील वृत्तीला जगासमोर आणले. वयाची नव्वदी ओलांडली तरी आवाजातलं चिरतरुण चैतन्य न हरवलेली ही गायिका शेवटपर्यंत नव्या प्रयोगांसाठी सज्ज होती. हिंदीत जागतिक कीर्ती मिळवूनही मराठी मातीशी त्यांची नाळ घट्ट होती. ‘रेशमाच्या रेघांनी’मधील लावणीचा ठसका असो, ‘केव्हा तरी पहाटे’ मधील विरह असो वा ‘विठ्ठला तू वेडा कुंभार’ मधली भक्ती; आशाताईंनी मराठी संस्कृतीच्या सर्व छटा आपल्या सुरात उतरवल्या. गदिमा, सुरेश भट आणि शांता शेळके यांच्या शब्दांना त्यांनी दिलेला न्याय मराठी मनावर कायमची भुरळ घालणारा ठरला. सुरांच्या साम्राज्यातली ही राणी खऱ्या आयुष्यात कमालीची साधी होती. त्या केवळ एक महान गायिका नव्हत्या, तर एक उत्कृष्ट सुगरण, क्रिकेटची चाहती आणि आपल्या मुलांची-नातवंडांची काळजी घेणारी हळवी माता होत्या. ज्या ताकदीने त्या सुरांशी खेळायच्या, त्याच आपुलकीने त्या स्वयंपाकघरातही वावरायच्या. इतके यश आणि मान-सन्मान (पद्मविभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार, महाराष्ट्र भूषण) मिळवूनही त्यांचे पाय कायम जमिनीवरच होते. आज आशाताई आपल्यात नाहीत, हे वास्तव स्वीकारणे कठीण आहे. त्यांनी केवळ हिंदीच नाही, तर अनेक भारतीय भाषांमध्ये गाणी गाऊन भारतीय संस्कृतीला समृद्ध केले. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीतातील ‘ऊर्जा’ देणारा आवाज शांत झाला आहे. पण जोपर्यंत या जगात संगीत राहील, जोपर्यंत एखादी ‘रात्र अजुनी तरुण’ असेल आणि जोपर्यंत कुणी आपल्या प्रियकराला ‘जिवलगा’ म्हणून साद घालेल, तोपर्यंत आशा भोसले यांचा हा दैवी आवाज आपल्या आसपास दरवळत राहील. शून्यातून स्वरांचं विश्व निर्माण करणारी ‘आशा’ आज मावळली असली, तरी त्यांच्या गाण्याच्या रूपाने त्या प्रत्येक श्वासात अजरामर राहतील.।। स्वरसम्राज्ञी आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली !!







