लातूर – कृतिशील शिक्षण व नाविन्यपूर्ण अभ्यास पद्धतीचा अवलंब करत लिट्ल एंजेल्स शाळा मुलांमध्ये सकारात्मक बदल व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्न करत असते. या उपक्रमांची व मूल्याधिष्ठित शिक्षणाची दखल घेत ध्येय एज्युकेशन फाउंडेशन, महाराष्ट्र तर्फे लिटल एंजेल्स ज्युनिअर स्कुल लातूर ला राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. शाळेने यापुढेही आधुनिक शिक्षण पद्धतीतून अनेक आदर्श विद्यार्थी घडवावेत यासाठी हा दिला गेलेला पुरस्कार नक्कीच समाजात शाळेची उंची व सन्मान वाढवणारा आहे.
वेदाज् एज्युकेशनल सोसायटी लातूर संचलित लिटल एंजेल्स ज्युनिअर स्कुल ही शाळा लातूरच्या पूर्व भागात अनेक वर्षापासून उल्लेखनीय जबाबदारी पार पाडत आहे. उत्कृष्ट दर्जाचा सीबीएसई चा अभ्यासक्रम पूर्व भागातील विद्यार्थ्यांसाठी कृतिशील व गुणवत्तापूर्ण पद्धतीने चालवला जातो. शिक्षणासोबतच योग्य संस्कारक्षम कार्यक्रमांची सांगड घालून मुलांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष दिले जाते. ध्येय एज्युकेशन फाऊंडेशन च्या वतीने लातुर येथे कार्यरत असलेल्या सौ. स्वाती कल्याणे मॅडम या अनेक शाळेंना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करतात. त्यांनी आमच्या शाळेच्या उल्लेखनीय कार्याची माहिती वरील वरिष्ठापर्यंत पोहचवली. व अशा महाराष्ट्रातील अनेक शाळेंचे निरीक्षण करून ७२ शाळेंची निवड “आदर्श शाळा” पुरस्कारासाठी करण्यात आली.
ध्येय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्र तर्फे पुणे येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात रविवार दि. २९ मार्च रोजी एज्युकेशन आयकॉनस समीट – २०२६ या दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळ्याची आयोजन करण्यात आले होते.
ध्येय एज्युकेशन फाउंडेशनचे संचालक श्री. सुदामजी शेंडगे व आदरणीय श्री. दत्तात्रय वारे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली हा दिमाखदार सोहळा विद्यार्थी, संस्थाचालक व शिक्षकांच्या सन्मानासाठी आयोजित केला होता.
या कार्यक्रमास पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौर सौ. शर्मिला बाबर, छत्रपती संभाजी नगरचे उपजिल्हाधिकारी श्री. शुभम पवार, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर, शिक्षण मंडळ सभापती श्री. नानासाहेब शिवले तसेच ध्येय फाउंडेशनचे इतर कार्यकारी अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. वरील सर्व सन्माननीय व्यक्तींकडून प्रत्येक शिक्षकाला समर्पित भावनेने कार्य करण्याची प्रेरणा मिळाली.
आधुनिक शिक्षण क्रांतीचे प्रणेते, राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित आदरणीय श्री. दत्तात्रय वारे गुरुजी व आदरणीय श्री. सुदामजी शेंडगे यांच्या हस्ते प्रत्येक शिक्षकाला व संस्थाचालकाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्रात आधुनिक नाविन्यपूर्ण व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी महाराष्ट्रातील काही शाळेंना व शिक्षकांना पुरस्कार व जबाबदारी देण्याचे काम या दोन शिक्षणप्रेमींनी केले. समाजात खरी क्रांती घडवायची असेल तर शिक्षणाबरोबर सामाजिक बांधिलकी, नैतिक मूल्य आणि समविचारी सहभाग आवश्यक आहे. आदर्श विद्यार्थी घडवायचे असतील तर आधी शिक्षकाला प्रोत्साहित केलेच पाहिजे तरच तो उत्साहाने आपली जबाबदारी अजून सक्षमपणे पार पाडतो. या पुरस्काराच्या माध्यमाने या दोन शिक्षणप्रेमींनी प्रत्येक संस्थाचालक व शिक्षकाला पुढील भविष्यात शाळेसाठी लागेल ती शैक्षणिक मदत करण्याचे आश्वासनही दिले. या दोन शिक्षणप्रेमींची शिक्षणाप्रती तळमळ पाहून तेथे उपस्थित असलेला प्रत्येक जण प्रेरणेने ओतप्रोत झाला होता.
आदरणीय वारे गुरुजी यांच्या मार्गदर्शना खाली लिटल एंजेल्स ज्युनिअर स्कुल ने येणाऱ्या भविष्यात अजून जिद्दीने, जबाबदारीने व तळमळीने विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.








