डॉ. माया कुलकर्णींसह विविध क्षेत्रातील महिलांचा सहभाग लातूर/प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या वतीने लोकसभेच्या विशेष अधिवेशनात नारीशक्ती वंदन अधिनियम विधेयक मांडले असल्याने या माध्यमातून महिलांना लोकसभा व विधानसभेमध्ये आरक्षण प्राप्त होणार आहे. हे विधेयक महिलांचा सन्मान वाढविणारे असल्यामुळे त्याच्या समर्थनार्थ शहरातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांनी एकत्र येत पदयात्रा काढली होती. या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या पदयात्रेत डॉ. माया कुलकर्णी यांच्यासह विविध क्षेत्रातील महिलांनी यामध्ये सहभाग नोंदविला होता. लोकसभेच्या विशेष अधिवेशनात नारीशक्ती वंदन अधिनियम विधेयक मांडले असून लवकरच याचे कायद्यात रुपांतर होणार आहे. या विधेयकामुळे लोकसभा, राज्यसभा यासह विधानसभा व विधान परिषदेमध्ये महिलांना आरक्षण प्राप्त होणार आहे. या आरक्षणाचा लाभ प्रत्येक क्षेत्रातील महिलांना मिळणार असून यामुळे कायदे निर्माण करणाºया सभागृहात महिलांना मोठ्या प्रमाणात स्थान प्राप्त होणार आहे. हे विधेयक महिलांचा सन्मान वाढविणारे असल्यामुळे याच्या समर्थनार्थ लातूरशहरातील महिलांनी एकत्र येवून गुरुवारी सायंकाळी गंजगोलाई ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क या दरम्यान पदयात्रा काढली होती. या पदयात्रेत शहरातील ज्येष्ठ महिला तज्ज्ञ डॉ. माया कुलकर्णी यांच्यासह डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर, सौ. संजिवनी कराड, शितल मालू, रागिनी यादव, मीना गायकवाड, शोभा पाटील, स्वाती घोरपडे, ज्योती आवसकर आदींसह विविध क्षेत्रातील महिलांनी मोठ्या संख्येनी सहभाग नोंदविला. या रॅलीत सहभागी झालेल्या महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनापर घोषणाही दिल्या. गंजगोलाई येथील माता जगदंबादेवीची आरती करून या रॅलीस सुरुवात झाली तर संविधानकर्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून या रॅलीची सांगता करण्यात आली. सदर रॅलीत शोभा कोंडेकर, अॅड. शितल पाटील, अॅड. मिनाक्षी पाटील यांच्यासह शहरात असलेल्या विविध भजनी मंडळाच्या महिला, आशाताई, स्वामी समर्थ केंद्राच्या सेवेकरी तसेच विधी व वैद्यकीय क्षेत्रातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता. विधेयकाच्या समर्थनार्थ विविध उपक्रम नारीशक्ती वंदन अधिनियम विधेयकाच्या समर्थनार्थ लातूर शहर जिल्हा भाजप महिला आघाडीच्या वतीने अध्यक्षा शितल मालू यांच्या नेतृत्वात विविध उपक्रम राबविण्यात आले. सदर विधेयक सभागृहात आणल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद करून त्यांचे अभिनंदनासाठी तब्बल चार हजार पोस्टकार्ड पाठविण्यात आले. त्याच बरोबर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क ते दयानंद महाविद्यालय यादरम्यान महिलांची बाईकरॅलीही काढण्यात आली होती. शहरातील विविध भागामध्ये स्वाक्षरी मोहीम व मिसकॉल अभियानही घेण्यात आले.










