लातूर : सामाजिक जाणीवेचा सुंदर संदेश देणारी एक हृदयस्पर्शी घटना नुकतीच घडली. सामाजिक कार्यकर्ते संजय राजुळे यांच्या घरी नवजात मुलीचा जन्म झाला आणि या आनंददायी क्षणाला त्यांनी समाजोपयोगी वळण देत अनोख्या पद्धतीने साजरा केला. खुशीग्राम फाउंडेशनमधील अनाथ व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांनी आपल्या मुलीच्या जन्माचा आनंद समाजासोबत वाटला.
वैष्णवी इंडॉस्कॉपी हॉस्पिटल येथे पार पडलेल्या या उपक्रमात वही, पेन, पुस्तके तसेच स्टीलच्या पाण्याच्या बाटल्या अशा आवश्यक शैक्षणिक साहित्याचे विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले. या प्रसंगी डॉ. राजेश दरडे, डॉ. वर्षा दरडे, संपादक दत्तात्रय परळकर, खुशीग्रामचे संचालक मधुकर सोनवणे यांची उपस्थिती लाभली. तसेच नवजात बालिका आणि तिची आई सावित्री संजय राजुळे यांचाही या प्रसंगी विशेष सहभाग होता.
विशेष म्हणजे, ही गोंडस बालिका रामभक्त हनुमान जयंतीच्या पवित्र दिवशी, गुरुवारी जन्माला आली. त्यामुळे या आनंदोत्सवाला एक धार्मिक आणि सांस्कृतिक अधोरेखितही लाभले.
संजय राजुळे यांनी आपल्या मुलीच्या जन्माचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता समाजातील गरजू मुलांपर्यंत पोहोचवला. त्यांच्या या उपक्रमातून “खरा आनंद तोच, जो इतरांसोबत वाटला जातो” हा संदेश अधोरेखित झाला. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.








